Ads Right Header

Girl in a jacket
Girl in a jacket
गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना होणार हजार रुपये दंड

गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना होणार हजार रुपये दंड

 सोलापूर (१ मार्च) - गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांविरुध्दची मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे. शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, एस. टी. स्टँड, प्रादेशिक परिवहन कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी आणि शासकीय दवाखान्याच्या परिसरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना एक हजार रुपये दंड केला जाणार आहे.कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी विनामास्क फिरणाऱ्यांविरुध्द तीव्र कार्यवाहीचे आदेश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री जाधव यांनी सांगितले की, एस.टी. स्टँड आणि रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तपासणी कर्मचारी नियुक्त करावेत. मास्क वापरण्यासाठी प्रवाशांना सूचना द्याव्यात. सॅनिटायझरची व्यवस्था करावी, जे नागरिक विनामास्क आढळतील त्यांना एक हजार रुपये दंड करावा.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्यासह सर्व संबंधित विभागांनी आपआपल्या जबाबदारीचे काटेकोर पालन करावे. आरोग्य विभागांतील सर्व घटकांनी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच टेस्टिंग,ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीच्या आधारे काम करावे.

जिल्हा परिषदेच्या वतीने राबवले जाणारे ‘माझे गाव कोरोनामुक्त गाव मोहीम’ ग्रामीण भागात प्रभावीपणाने राबवावी. ग्रामीण भागातील संशयित रुग्णांना स्थानिक स्तरावरच संस्थात्मक विलगीकरण करावे. कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचनाही श्री. जाधव यांनी दिल्या.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रवींद्र आवळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर उपस्थित होते.

Previous article
This Is The Newest Post
Next article

Ads Post 4