दसरा – उत्सव अन्नसमृद्धीचा, समतेचा आणि एकतेचा !

दसरा – उत्सव अन्नसमृद्धीचा, समतेचा आणि एकतेचा !

गेले काही वर्ष ‘दसरा’ सण नवनवीन आदिवासी भागात, वेगवेगळ्या समूहांत साजरा करण्याचा योग आला. यावरून काही निरीक्षणे, त्या परंपरांच्या माहितीसह इथे नोंदवावीशी वाटतात.
दसरा म्हटलं कि विजयाचा उत्सव आणि त्यानिमित्ताने सोन (आपट्याची पाने) लुटण्याची याचा कथा आपल्याला माहित आहे, पण त्यापलीकडेही दसरा मला खूप विशेष वाटतो.
या दिवसात निसर्ग त्याच्या सर्वोच्च आनंदात असतो. पाऊसपाणी आटोपून रानातल्या अल्पजीवी वनस्पतींना रंग-रंगांची फुले आलेली असतात, चकचकीत ऊन, वातावरणातील आल्हाददायकता आणि शेतीच्या कामांतून मिळालेली उसंत ह्या सर्व गोष्टी उत्सवात प्रसन्नता वाढवतात.

दसरयाच्या आधी 9 दिवस जगदजननी स्त्री शक्तीची उपासना केली जाते. अनेक समूहात स्त्री-पुरुष असे सर्वच या दिवसात उपवास ठेवतात. स्त्रीचा सन्मान, आदर हेच यातून प्रेरित होते, शिवाय त्यात स्त्रीला तिच्यातील शक्तीची जाणीव व्हावी, अशाही कथा आहेत.

या नवरात्रीच्या दिवसात घरोघरी ९-१८ धान्यांचे बीज पेरून घट बसवले जातात. हे शेतीसंस्कृतीच्या खूप जवळ जाते. आजपर्यंत बीजांची जोपसना स्त्रियांनीच केलेली आहे. त्यामुळे रब्बीच्या हंगामात कोणते बियाणे चांगले रुजणार, याची हि टेस्ट पण होऊन जाते. याशिवाय यानिमित्ताने बियाणे सांभाळले जातात. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवे, कि सर्व शहरी-ग्रामीण, शेती करणाऱ्या, न करणाऱ्या सर्व महिला घट बसवतात, म्हणजे हि सामुहिक जबाबदारी आहे, याची आपल्याला जाणीव होते व शेतीशी आपली नाळही टिकून राहते.

आता या काही वेगळ्या भागांतील परंपरा पाहू..
१. दसऱ्याच्या दिवशी शेतात नवीन आलेले धान्य, पिक याची कणसे, आपट्याची पाने (जंगल समृद्धीचे प्रतिक असावे का?)  शेतीत वापरली जाणारी अवजारे जसे पेरण्याची पाभर वगैरे असे सर्व घेऊन घरातील कर्ता पुरुष मंदिरात पूजेसाठी घेऊन येतो, यास आमच्या भागात सीमोल्लंघन असे म्हणतात. जुन्या काळी लढाईला निघताना हा दसऱ्याचा मुहूर्त साधून सीमोल्लंघन होत असे, पण या परंपरेत काळानुसार बदल झाला असावा का? त्यानंतर हा पुरुष घरी येतो तेव्हा घरातील स्त्रिया त्याला ओवाळतात, मग गावातील मंडळी एकमेकांच्या घरी जाऊन सोने (आपट्याची पाने) वाटतात.. घरोघरी आंब्याची पाने आणि झेंडूंच्या फुलांनी घराची सजावट केली जाते. जसे आपल्याकडे फुलांची तोरणे लावली जातात, तसे आदिवासी भागात घरांवर शेणाने बनवलेल्या गोळ्यांतून, रानातल्या फुलांतून, पानांतून सजावट केली जाते. घरोघरी गोड-धोड बनवले जाते.


२. अहमदनगर-नाशिक जिल्ह्यातील आदिवासी (महादेव कोळी) गावातील सर्व कुमारवयीन मुली ‘भोडाई’ नावाचा खेळ खेळतात. म्हणजे या सर्व मुली गावातून तांदुळ, पैसे गोळा करतात. नवरात्रीच्या सर्व दिवसात हा त्यांचा क्रम चालतो. यांच्यासोबत एक कलश असतो, त्यात शेतात असलेल्या नाचणी, वरईची हिरवी कणसे, भाताची कणसे, खुरासनीची फुले, कुरडूची भाजी असे सर्व ‘अन्नसमृद्धीचा’ कलश डोक्यावर घेऊन गाणी म्हणतात, हा कलश, म्हणजेच ‘भोंडाई’ डोक्यावर घेऊन नाचवतात.


जमलेल्या सर्व तांदळाची दसऱ्याच्या दिवशी खीर बनवली जाते. खिरीचे इतर साहित्य जमलेल्या पैशातून जमा होतात. गावातील सर्व लोक एकत्र येऊन ती खीर खातात. वाटून खावे, एकत्र राहावे, निसर्ग जपावा हेच तर यातून प्रतीत होतं.

३. गडचिरोली आदिवासी (माडिया गोंड) भागात पाहिले लहान मुले - मुली एकत्र येतात, मोठे त्यांना गावाच्या सीमेवर घेऊन जातात. तिथे पाण्याने भरलेले कलश ओतून सरळ रेषा आखायची आणि त्याचे पूजन करायचे, यात मुलीही असतात हे विशेष. कदाचित जुन्या पिढीकडून नवीन पिढीला दिलेली आपल्या सीमेची माहितीच असावी.

४. धुळे जिल्ह्यातील आदिवासी (कोंकणा) भागात पहिले कि, सर्व गावातील महिला पुरुष सकाळी एकत्र जमतात, वाद्यांच्या तालात हा जमाव गावातून चालू लागतो. महिलांच्या डोक्यावर पाट्या असतात. या पाटीत शेतात पिकलेल्या मोठ्या काकड्या असतात. हे सर्व गावच्या नदीवर पोहचतात. मग पुरुष मानाडली नदीत अंघोळ करतात, नदीची पूजा होते व सर्वांनी आणलेल्या काकड्या कापून सर्वजण एकत्र येऊन प्रसाद म्हणून खातात.

त्यानंतर सर्व घरी येतात. घर स्वच्छ सारवलेले असते, गाव प्रसन्न असत. सर्व मिळून दोन तीन बोकड कापतात. त्याचे जेवढे घरे असतात, तेवढे वाटे केले जातात. म्हणजे कलेजा असेल तर त्याचे छोटे छोटे पनीरच्या क्यूब सारखे रेखीव क्यूब बनवले जातात. असे बोकडाच्या इतर सर्व अवयवांचही. प्रत्येक घराच्या वाट्यात प्रत्येक भाग. त्या दिवशी संध्याकाळी घरो-घरी मटण शिजले जाते. इथेही सर्व गाव एकत्र येते हे महत्वाचे.

५. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी (भिल्ल) गावांत या दिवसांत गावच्या ‘कणसारी’ देवीची यात्रा भरते. हि कणसरी देवी धान्यांची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. सर्व गावकरी एकत्र येतात, एकमेकांना भेटतात, सार्वजन नवीन कपडे परीषण करतात. महिला त्यांचे ठेवणीतले पारंपरिक चांदीचे दागिने अंगावर चढवतात. गावात रोज विशिष्ट प्रकारात नाच-गाणे होते. सर्व तरुण मुले-मुली यात जास्त सहभागी होतात. घरोघरी आपल्या शेतातील गावठी चविष्ट मक्याची कणसे, शेतात निघालेल्या घुंगरयाच्या शेंगा भाजून खाल्ल्या जातात. खाणे, पिणे एकत्र येणे, संगठन, चर्चा अशा सर्वच गोष्टी मोठ्या अनादानी साजऱ्या केल्या जातात. या भागातली काठ्याची यात्रा यासाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे आजूबाजूच्या गावांतील लोकही यात सहभागी होतात. पाहुणे-रावळे-मित्र परिवार सर्वच.

६. कोकणातील गावीही मंदिरात शिवलग्न लागते. या लग्नात गावातील सर्व देवताच्या प्रतिनिधी देवकाठी निघतात. त्यासाठीची कामे सर्व ग्रामस्थ आदराने, सन्मानाने करतात. वाजत गाजत काठ्या जमतात, आणि मग शिवाचे लग्न लागते आपट्यांच्या पानांच्या चुंबळीबरोबर. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात सर्व गाव एकत्र येते, संगठन होते. गावराहटी चालवायची असेल तर सर्वसमावेशकता व संगठन आवश्यकच असते. इथे मात्र नवीन अन्नपौर्णिमा वेगळ्या दिवशी साजरी केली जाते, म्हणजे त्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला.
अशा दसरा हा सण साजरा करण्याच्या पद्धती गावोगावी खूप भिन्न आहेत, भारतामध्ये एकूण ५५० आदिवासी जमाती वास्तव्य करतात, यात किती विविधता असेल याची कल्पना येऊ शकते. पण या सर्वांत एक सामान्य दुवा आढळतो, शेतीबद्दलचे ज्ञान, अन्नसमृद्धी व त्याबद्दलचा आदर, सामूहिकता व संगठणाचे महत्व, स्त्रीशक्तीची जाणीव व सन्मान आणि निसर्गानुरूप जगण्याची जिजीविषा !

Post a Comment

Previous Post Next Post

Ads